Monday, August 13, 2007

आश्रित

साठा पैकी तेवीस मी पाहिली. उरलेल्या सदतीसामध्ये काय होऊन गेले, तेही मी शिकलो. "इतीहास" लिहायला गेलो म्हणून हातावर पट्टी बसली, मग "इतिहास" लिहित गेलो. मराठी शब्द हे जसे उच्चारतो तसेच लिहायचे असतात, ह्या वाक्याला पूजून इतिहास पण तसाच वळणदार अक्षरांमध्ये लिहित गेलो. पण ते शब्द तसेच का उच्चारायचे, कधी कुणाला विचारले नाही. इतिहास, खरच तसा होता, असे मानून चाललो...
सातवी 'ब' मध्ये होतो तेव्हा, दूसर्या वर्गात असलेल्या जोशी, खरे, आपटे नावाच्या मुलांवर माझ्या वर्गातले हसायचे. "भांडखोर भट्टांच्या बरोबर आपण नाय खेळणार" असा माझा मित्र बोलला की मी ही त्यांच्या बरोबर हसायचो, का ह्सायचो माहित नाही... पण सगळे हसतात म्हणून मी पण...आठवी 'अ' मध्ये आलो. तेव्हा जोशी, आपटे माझे मित्र झाले, त्यांच्या बरोबर हसायचो, ते म्हणायचे "गान्धीला अजिबात अक्कल नव्हती". वाचलेला इतिहास बहुतेक तेव्हा मला आठवत नसेल. इतिहास घोकून मार्क्स मिळवणार्‍यांबरोबर शिकलो होतो मी. मला सामाजिक शास्त्रात का नाही एवढे चांगले मार्क्स येत नाहीत, असा प्रश्न बाबा विचारायचे...
एके दिवशी टीव्ही वर, भगवे कपडे घातलेल्या कुणाला तरी मशिदीवर हातोडा घालताना बघितले. हिंदुत्वाचा तो विजय होता असेही कानावर पडले. घराच्या दरवाजावर "गर्व से कहो, हॅम हिंदू हे" असा स्टिकर लावला, तेव्हा बहूतेक विसरलो होतो, हिंदू - मरण नाही शरण देणार्‍याचा धर्म आहे...
एकदा एन.सी.सी. च्या सरांनी विचारले, "तुमच्या मधले किती आर्मी जॉइन करणार?" हात वर करणारा मी पहिला होतो. दहावी झाल्यावर सर्व म्हणाले आर्मी एवढा चांगला करीअर ओप्शन नाही, फार रिस्क आहे... मी ही हो म्हणालो...
आश्रित होतो तेव्हा मी. आता सुद्धा आश्रित आहे. कधी माणसाला त्याच्या समाजा वरून ओळखणार्यांचा. कधी पाठ करून मार्क्स मिळवणार्यांचा. एकदा सुद्धा, प्रश्न विचारला नाही. पण आता वाट सोडून पुढे जाता येणार सुद्धा नाही. म्हणून अजूनही आश्रित आहे मी, ए.सी. कारमध्ये बसून ओफीसला जाताना, साठी उलटली तरी सायकल वरुन कामाला जाणार्‍या वृद्धावर, कारच्या रस्त्यामधे आला म्हणून डाफरणार्‍या कालीग्सचा. मॉल मध्ये बसून भारताची ईकोनोमी स्टडी करून झाल्यावर, पार्किंग लोट बाहेर भीक मागत असलेल्या पाच वर्षाच्या मुलाची घाण वाटणार्‍या मित्रांचा. आश्रित आहे मी, "सेफ" आणि "सेटल्ड" जगण्याच्या मनोवृत्तीचा. आश्रित आहे मी, साठी पूर्ण होत असताना, मागे जे राहीले त्यांना विसरणार्‍या भारताचा...

1 comment:

Onkar Bhardwaj said...

man please..

there is a writer in making,never give it up..

this blog entry is simply simply awesome. Perfectly catches parochial attitude of chameleons in the society, perhaps myself being one of those without realizing i am one of those, as chameleons perhaps never realize..

onkar